सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

जोगेश्वरीत इको - फ्रेंडली गणेशमूर्ती व मखरांचे उद्घाटन


गेल्या काही वर्ष्यामध्ये प्लास्टर ऑफ प्यारीसच्या मूर्त्यांच्या विसर्जनामुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्यामुळे इको - फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका तसेच अनेक स्वयंसेवी संघटना आटोकाट प्रयत्न करीत आहेत . या मोहिमेला साथ देण्यासाठी जोगेश्वरी पूर्व इको - फ्रेंडली गणेशमूर्ती व मखरांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .याचे उद्घाटन शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते आज दिनांक २१ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी करण्यात आले .या प्रसंगी नगरसेवक श्री अनंत नर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  हे प्रदर्शन २१ ( एकवीस )ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत असून जनतेसाठी हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे . 
      देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . मोठ्या श्रद्धेने प्लास्टर ऑफ प्यारीसची गणेशमूर्ती घराघरामध्ये आणण्यात येते .  गणेशाच्या पुढे थर्माकोलची आरासही करण्यात येते . प्लास्टर ऑफ प्यारीसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे समुद्र , तलाव , विहिरीचे पाणी दुषित होते . बऱ्याचवेळा या मूर्ती पाण्यात पटकन विरघळत नसल्याने दुसरया दिवशी भग्नावशेषातील काही मूर्ती चौपाटीवर दिसून येतात .  या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करावे लागते  तसेच पर्यावरणाला हानिकारक ठरणारा थर्माकोल सुद्धा कालांतराने टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाला बाधा पोहचते .  यातून मार्ग काढण्यासाठी तसेच पाण्याचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी इको - फ्रेंडली अश्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन ठिकठीकाणी भरविण्यात येत आहे . 
    इको - फ्रेंडली गणेशमूर्ती जनतेने खरेदी करून गणेशोत्सव साजरा करावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे .  याला साथ देण्यासाठी सिद्धिविनायका आर्ट तर्फे व स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पूर्व येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर मंच , श्यामनगर तलावाजवळ , जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड , येथे भरविण्यात आले आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा